पुणे : फ्लॅट खरेदीचा व्यवहार करून ठरलेली रक्कम न देता बेकायदेशीररीत्या ताबा मिळविल्याचा प्रकार कोंढवा परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी प्रवीण मंचलाल ओसवाल व भारती प्रवीण ओसवाल यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२९(३) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास येवलेवाडी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
याबाबत बांधकाम व्यावसायिक प्रकाश रामचंद्र जैन (वय ५२, रा. बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील ‘मंडोत टॉवर्स’ या इमारतीतील दहाव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक १००३ चा व्यवहार २७ एप्रिल २०२१ रोजी ७० लाख रुपयांना ठरला होता. त्यावेळी ओसवाल यांनी २० लाख १० हजार रुपये अदा करून उर्वरित रक्कम सात महिन्यांत देण्याचे मान्य केले होते.
मात्र, ठरलेली मुदत उलटूनही उर्वरित रक्कम न दिल्याने जैन यांनी वारंवार पाठपुरावा केला. तरीही ओसवाल यांनी टाळाटाळ केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान, ऑगस्ट २०२५ मध्ये ओसवाल व त्यांच्या साथीदारांनी जैन यांच्या कार्यालयात जाऊन फ्लॅटचा ताबा देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे.
त्यानंतर जैन यांनी ३० ऑगस्ट २०२५ रोजी करार रद्द करून घेतलेली रक्कम धनादेशाद्वारे परत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ओसवाल यांनी ती रक्कम स्वीकारण्यास नकार देत फ्लॅटचे सेल डीड करून देण्याची मागणी केली.
दरम्यान, संबंधित फ्लॅटवर पुणे महानगरपालिकेचा कर थकबाकीमुळे सील लावण्यात आले होते. तरीही नोव्हेंबर २०२५ मध्ये ओसवाल यांनी परवानगीशिवाय कुलूप व सील तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला तसेच वीज कनेक्शनही स्वतःच्या नावावर घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.














